
विफल होऊन हात टेकण्या अगोदर "बळीराजा" होण्याचा फॉर्म्युला नक्की वाचा!
शेअर करे
ज्याला काहीच येत नाही तो शेती करतो असे म्हणणाऱ्या समाजाला आपल्या मनगटात किती ताकद आहे, हे दाखवायची वेळ आली आहे. मित्रा.. वावर आहे तर पावर आहे!
जर मागच्या पाच-सहा हंगामात तुमच्या डोक्यावर कर्ज वाढले असेल, नफा होण्या ऐवजी मनस्ताप झाला असेल, तुमची झुंज लक्षात घेण्याऐवजी, लोकांनी तुम्हाला हिणवल असेल, शेतकरी नवरा नको, म्हणून नकार मिळाला असेल, शेती विकून शहरात जायचा विचार सुरू असेल तर.. हा लेख वाचत रहा..
आपला देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जात असले तरी सत्य काय आहे तुम्ही जाणता. प्रशासन कार्यालयात सापडत नाही, सरकारे तुमच्या तोंडाला पाने पुसते, वर्तमानपत्र शेतकरी आत्महत्यांचे आकडे छापते आणि न्यायालये डोळ्यावर पट्टी बांधनू असल्याने, तुम्हाला पाहू देखील शकत नाही. आपला देश कृषि प्रधान नाही, हे सत्य शक्य तितक्या लवकर लक्षात घ्या!
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचे हात घ्यावे! तुम्हाला पिकवता येते पण विकता येत नाही! हा विचार नाही, व्यापाऱ्यांनी तुमच्या मनात ही खुंट गाडून ठेवली आहे. तुम्हाला पिकवता येते पण भांडवला साठी माझ्या कडून कर्ज घ्या! सावकार, बँक, सोसायटयांनी तुमच्या ठेवी आटवून, तुम्हाला दावणीला करकचून बांधले आहे. मित्रहो, या पुढे हे चालणार नाही.. या लोकांनी आज पर्यंत आपल्याला खूप दिले.. आता आपण त्यांना परत द्यायला हवे. आपल्यावर लादलेले वैफल्य आपण त्यांना परत करायला हवे!
जगाच्या आर्थिक प्रगतीला फक्त शेतकरी जबाबदार आहे. तो प्रत्येक वस्तु अधिकतंम किमतीत विकत घेतो आणि सर्व काही होलसेल भावात विकतो. दोन्ही बाजूचे भाडेही तोच भरतो - जॉन एफ केनेडी
आपल्याला उत्पादकतेचे धडे देणारी विद्यापीठे किती पाण्यात आहेत? त्यांची हेक्टरी उत्पादकता किती आहे? त्यांच्या जमिनीत किती कर्ब शिल्लक आहे? त्यांच्या हंगामाचा नफा-तोटा कसा आहे? हवनाचे मंत्र म्हणणाऱ्या भटासारखी यांची लायकी आहे. हे फक्त खोबरे, खारका आणि सुपऱ्या गोळा करण्यापूरता आहेत. पांढरे हत्ती आहेत. यांच्या मनात आणि कर्मात शेतकऱ्याच्या भल्याची भावना शिल्लक आहे का? ते फक्त पगाराच्या दिवसाची वाट पाहतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
बियाणे आमचे घ्या, खते आमची घ्या, औषधी आमची घ्या, सिंचन आमचे घ्या, यंत्रे आमची घ्या.. आमचा तो ब्रॅंड. मित्रहो, या जगात एकमेव ब्रॅंड आहे, तो आहे “शेतकरी”. हजारो वर्षांची परंपरा असलेला ब्रॅंड आहे, "शेतकरी". याने खाऊ घातले नसते, नेसवले नसते तर ह्या कंपनी वाल्यांनी काय खाऊन पार्ट्या झोडल्या असत्या? आणि कुठला टाय-कोट घालून नाचले असते?
जाहिराती करून ब्रॅंड ठरत नसतो. ग्राहक आपसात ठरवून ब्रॅंड ला ओळख देतात - स्कॉट कुक
झीरो बजेट.. सरकारी पुरस्कार.. सेंद्रिय शेती.. गाईचे मल मूत्र.. या कृषिभूषण लोकांचे कार्यक्रम घेता घेताच किती तरी शेतकरी बांधव देशोधडीला लागले आहेत! अरे चांगले बोलता येते, तुमच्या आवाजात खुमार आहे, बोली.. मायबोली आहे याचे भांडवल करून आमचा वेळ का खोटी करताय? तुमच्या शेतात जा, करून दाखवा आणि मग घ्या की आकाश अंगावर!
शेवटचा समाचार घेऊ सल्लागार लोकांचा! पीडीएफ फायली आणि व्हिडिओ रील बनवून आपल्याला शेती शिकवून राहिले आहेत. हे एकतर भूमीहीन असतात किंवा स्वत:च्या शेतात राबायचे नाही म्हणून कंपनीची चाकरी करतात. शंभरात एखादा शोधून त्याची यशोगाथा दिवसातून चारदा सांगतं बसतात. यांनी एक तर हिरवेगाव दाखवून द्यावे! यांना “एखाद्या पूर्ण गावाची यशोगाथा दाखवा” म्हणावे. प्रत्येक गावकरी बंगल्यात रहातो आणि गाडीत फिरतो अशी जाज्वल यशोगाथा सांगावी. एका हंगमाने बदल होत असतो का? एकदा करोडोचे टमाटे झाल्याने शेकडो वेळा फेकून दिलेल्या मालाची भरपाई होत असते का?
शेती हा व्यवसाय जगातिल सर्वश्रेष्ठ आणि महानतम कला आहे - झेनोफोन
मित्रहो, ज्याला तुम्ही इकडे तिकडे शोधत आहात तो बळीराजा तुमच्यातच लपला आहे. तो हुशार, चाणाक्ष, अभ्यासू, हिशोबी, उदार बळीराजा तुमच्यातच लपला आहे. त्याला बाहेर काढायला हवे. तो चावडीवर चकाट्या पिटून बाहेर येणार नाही, तंबाखू चोळत बसणार नाही, मोबाइल चाफलणार नाही, तो डबडी बडवणार नाही. तो आल्यावर ढोल आसमान एक करतील, हजारो मोबाइल त्याचे फोटो काढतील. तो आला की समृद्धी चे पाट वहातील! .. तो शिवारातून येणार आहे, ही गाठ बांधून घ्या.
एक तीळ सात भावांनी वाटून खाल्ला नव्हता.. तो तीळ त्यांनी पेरला, जोपासला, वाढवला, फुलवला. मळणी केल्यावर आलेला मूठभर तीळ सर्वांनी वाटून घेतला! ज्ञान, कौशल्य आणि धिराने मूठभर पेरले की सूपभर होते. तो सूपभर पाहून हुरळून जात नाही.. दिलदार होत नाही. तो हिशोबी असतो. तो हिशोबी राहून, सुपावर सूप वाढवतो. नफा मिळवून कुणी श्रीमंत हो नसतो. त्याला नफा गुंतवून नफा वाढवावा लागतो. पैशाने पैसा वाढतो. चक्रवाढीतून जन्माला येतो.. तो असतो बळीराजा
मित्रहो, रिसेटएग्री डॉट इन या वेबसाइट च्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी नियमित संवाद साधत आहोत. दोन मिनिटांत वाचून होणारे आमचे लेख आपल्याला एक उत्तम शेतकरी व्हायला मदत करतील. काही लेख आपल्याला जागृत करतील, मनो धैर्य उंचावतील, उपयुक्त माहिती देतील, प्रश्न विचारतील किंवा सोडवतील. तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातून दोन मिनिट आमचे लेख नियमित वाचायचे आहेत. आम्ही कुठलीही फी मागत नाही. आमच्या फेसबुक पेजला लाइक करा किंवा व्हाटसअप चैनल ला जॉइन करा. नॉटिफिकेशन सुरू ठेवा आणि तयार व्हा.. रोज थोडे वाचन.. रोज थोडा बदल करायला!