
संकटांवर मात करत नफा देणारे व्यावसायिक सूर्यफूल व्यवस्थापन शेड्यूल नक्की वाचा!
Share
सूर्यफूल हे सोप्पे पीक आहे. मग या विषयी अधिक जाणून घेण्यात काय फायदा होईल? असा विचार अनेक शेतकरी बांधव करतात. पण वातावरणात अचानक होणारे बदल, वाढती महागाई, रोग-किडी, व्यवस्थापनातील चुका, एकतर त्यांचा नफा हिसकाऊन घेतात किंवा त्यांचा तोटा वाढवतात. या लेखात सूर्यफूलाचे व्यवस्थापन शेड्यूल / सूर्यफूल लागवड माहिती जाणून घेऊ, जे नफा तर देईलच नफ्याचे रूपांतर मालमत्तेत करायला देखील मदत करेल!
सूर्यफूल लागवड कधी करावी?
सूर्यफूल तेल देणारे सूर्यफूल हे पीक वर्षातून तीनवेळेस घेता येते. खरीपात जून-जुलै ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यन्त, रब्बीसाठी सप्टेंबर- ऑक्टोबर ते फेब्रुवारी-मार्च व उन्हाळी हंगाम जानेवारी-फेब्रुवारी ते एप्रिल-मे. अर्थात सर्व शेतकरी सूर्यफूल हे पीक तिन्ही सीजनमध्ये घेत नाही. काही शेतकरी कोणत्याही कारणाने शेत रिकामे पडू नये म्हणून मधल्या काळात एखाद्या वेळेस हे पीक घेतात. पण काही शेतकरी व्यावसायिक दृष्ट्या सूर्यफूल लागवड नियमित करतात. शेताच्या एका तुकड्यांत खरीपात हे पीक
सूर्यफूलाचा आकार जितका मोठा तितके त्याचे बी मोठे व उत्पादन देखील अधिक.अर्थात त्याला पोषण व वातावरण देखील पूरक असायला हवे. जगातील सर्वात मोठे सूर्यफूल अडीच फुट रुंदी चे असून ते जर्मनी मध्ये २०१४ मध्ये पाहण्यात आले होते.
घेतल्यावर रब्बी पीक पुन्हा याच जागेत घेणे शक्य नसते कारण पहिल्या पिकांची मळणी अजून बाकी असते. ऑक्टोबर मध्ये काढणी करून लगेच लागवड करू शकता पण तसे न करणे अधिक योग्य आहे कारण त्या जमिनीत रोग जिवाणू वाढलेली असतात व नुकसान संभवते. उन्हाळी पिकासाठी देखील जमिनीचा नवीन तुकडाच निवडावा. सर्व साधारण पणे वाढीसाठी थंड काळ व फूल अवस्थे साठी उष्ण काळ असे वातावरण मिळाले तर उत्पादनात वाढ होते. एका वेळी 33% पेक्षा जास्त जमीन सूर्यफूल लागवडी साठी ठेऊ नये. व्यावसाईक दृष्टिकोण असेल तर 5 एकर पेक्षा कमी क्षेत्रात लागवड नकोच.
सूर्यफूल लागवडीतून किती नफा मिळेल?
यूक्रेन, रशिया, चायना हे प्रमुख सूर्यफूल उत्पादक देश आहेत व तेथील उत्पादना नुसार सूर्यफूल बाजारभाव अवलंबून असतात. त्यामुळे अगोदरच कुचकामी असलेली सरकारी हमीभाव योजना फार उपयोगी ठरत नाही. लागवड करते वेळी दिसत असलेले भाव प्रत्यक्ष उत्पादन हातात आले की मिळतील असे नाही, त्यामुळे खर्च कमी ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. कमी खर्चात चोख नियोजन केले तर खर्चाच्या पांच पट उत्पादन होऊन, स्वत:चा खर्ची पडलेला वेळ व मेहनत आर्थिक गणितात धरून देखील दुप्पट ते तीन पट नफा होऊ शकतो. तीनही हंगामात पीक घेतल्याने सरासरी दर हाती लागून, प्रसंगी झालेले नुकसान वजा जाता शाश्वत नफा हाती येतो. लागोपाठ 4 ते 5 वर्ष आपण हे पीक घेत, नफा गुंतवत गेले तर, मालमत्ता खरेदी करता येईल इतका नफा नक्की जमा होईल. खर्च कमी ठेवण्याची व नफा वाढवण्याची योजना पुढे देत आहे.
सूर्यफूल लागवडीला कोण कोणते खर्च आहेत?
खर्च कमी ठेवण्याची योजना: स्वत:चे बियाणे वापरू शकता, खतांच्या बेसल व दूसऱ्या डोससाठी सबसिडीची खते वापरावी. महागड्या खतांवर अवलंबून राहू नये. सेंद्रिय भर खते देखील स्वनिर्मितच वापरावी. प्रत्येक मळणी नंतर रोटा मारत सूर्यफूलाचा भुसा मातीआड केला तर मातीचा कस वाढीस लागतो व फेरपालट पिकास भरखताची गरज कमी होत जाते. आता औषधीचा खर्च कमी कसा करायचा हे बघू, पिकाची अवस्था, वतावरण व आसपास च्या परिसरात कोणते पीक आहे, त्यानुसार कोणकोणते कीड रोग येऊ शकतात हे लक्षात घेऊन, निरीक्षण करावे, त्यानुसार प्रतिबंधात्मक योजना आखाव्यात. रस शोषक किडीच्या निरीक्षणासाठि चिकटसापळे तर बिया, पाने व धांडा पोखरणाऱ्या आळीच्या निरीक्षणासाठी कामगंध सापळे वापरावे. प्रतिबंधासाठी निमतेल-करंजतेल-एरंडतेल यांचे मिश्रण करून त्यात इमलसिफायर (साबण चुरा) घालावे व फवारणी करावी. सूर्यफूलयात तंबाखू अर्क वर्ज आहे. कीड अनियंत्रित असेल तर नियंत्रणासाठी केंद्रीय किटनाशक बोर्डाने सिफरीश केलेली कीटकनाशके वापरावी त्याची माहिती पुढे वेगळी देत आहे. बागायती उत्पादन जिरायतीच्या दुप्पट असते त्यामुळे जलसिंचनात कुठलीही कुचराई करू नये. या लेखात जिरायती लागवडीबद्दल चर्चा केलेली नाही. नफा वाढवण्याची योजना जाणून घेण्या अगोदर पीक निहाय वस्तुनिष्ठ बाबी जाणून घेऊ.
सूर्यफूल लागवड व्यवस्थापन
लागवडीची वेळ: तिन्ही हंगामातील लागवडीची वेळ अगोदरच दिली आहे. कोणत्याही कारणा मुळे लागवडीस उशीर होत असेल तर वाढीस कमी वेळ मिळून उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे पेरणीची वेळ चुकवू नये.
लागवडीची पद्धत: सूर्यफुलास खोलवर जाणारे सोटमुळ असते त्यामुळे रोपे तयार करून लावणे, या पिकासाठी, कठीण आहे. लागवड टोकन पद्धतीने करावी. मध्यम ते खोल जमिनीत ४५ सेंटीमीटर बाय ३० सेंटिमीटर, भारी जमिनीत ६० सेंमी बाय ३० सेंमी तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० सेंमी बाय ३० सेंमी अंतरावर करावी. बियाणे 5 से, मी. पेक्षा खोल टोंचू नये.
साधारण पणे सूर्यफुल रोपाची ऊंची ६ ते १० फुट असते पण हॅन्स पिटर नावाच्या जर्मन माणसाने ते ३० फुट ऊंची पर्यन्त वाढवले.
बियाणे निवड: बाजारात उपलब्ध बियाण्याची यादी खाली देत आहे. संकरित वाणाचे 1.5 ते 2 किलो तर सुधारित वाणाचे एकरी 2 ते 2.5 किलो बियाणे लागते.
- संकरित: पिकेव्हीएसएच-२७, पिकेव्हीएसएच-९५२, केबीएसएच-१, केबीएसएच-४४, डिआरएसएच-१, एमएसएफएच-८, एमएसएफएच-१७, फुले रविराज, एलएसएफएच-१७१, नारी, एनएच-१, बीएसएस-११, एपीएसएस-११.
सुधारित : शारदा, आनेगीरी, नारी-६, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.५६ मॉडर्न, सुर्या, सनराइज सिलेक्शन, भानु
- स्व:बियाणे: तेलबिया विकास संचालनालय (DIRECTORATE OF OILSEEDS DEVELOPMENT) द्वारा सिफरसी नुसार शेतकरी फुले रविराज (Phule Raviraj) व फुले भास्कर (Phule Bhaskar SS-8808) हे सुधारित वाण स्वत:च्या बियाण्याच्या विकासासाठी वापरू शकता. त्यासाठी निरोग झाडावरील टपोरे बियाणे वेगळे काढून घ्यावे. बियाण्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करून कोरड्या स्वच्छ जागी साठवावे. उगवण क्षमता तपासून वापरण्याचे ठरवावे. इतर शेतकरी बांधवांकडून किंवा विद्यापीठाकडून असे बियाणे मिळवू शकतात.
सूर्यफूल बियाणे चाचणी: उगवण क्षमता तपासून पहावी. स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेल्या ओल्या गोणपाटावर , भिजवून ठेवलेल्या 100 बिया रांगोळी च्या ठिपक्या प्रमाणे 10 ओळीत, 10 बिया अश्या ठेवाव्या. गोणपाटाची सुरळी बनवून, सुतळी ने बांधून, सावलीत उबदार ठिकाणी सात दिवस उबवावी. अंकुरित बिया मोजाव्या. 95 पेक्षा अधिक बिया अंकुरित असल्या तर बियाणे आहे तसे वापरू शकता पण अंकुरण कमी असेल तर बियाणे वाढवावे. 80 पेक्षा कमी बिया अंकुरित झाल्या तर ते बियाणे वापरूच नये. कारण त्यामुळे नंतर उभ्या पिकात रोगराई वाढू शकते.
बियाणे प्रक्रिया: पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रती किलो बियाण्यास २ ते २.५ ग्रॅम थायरम/ काबॅन्डॅझिम किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी तसेच केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी, विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू एस् ५ ग्रॅमची बीजप्रक्रिया करावी. त्याच प्रमाणे अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रती किलो वापरावे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन: हे पीक खूप वेगाने वाढते त्यामुळे पोषण द्रव्याची गरज मोठी असते. मातीची तयारी करते वेळी स्वत: तयार केलेल चांगले कुजलेले शेण-काडीकचरा खत १ ते १.५ टन एकरी वापरावे. सरकारी सबसिडीची खते वापरावी. एकरी 25 किलो नत्र, 12 किलो स्फुरद व 12 किलो पालाश द्यावे. यावेळी 3 किलो 90 टक्के गंधक पावडर मिसळू शकता. त्याव्यतिरिक्त फूल अवस्थेत विद्राव्य बोरान 20 ची फवारणी 10 ग्राम प्रती 15 लीटर दराने नक्की करावी. खताचा दूसरा हप्ता म्हणून एकरी 25 किलो नत्र, 3 किलो गंधक द्यावे. दाणे चांगले भरावे म्हणून 2 किलो पाण्यात विरघळणारे बोरान सोबत 5 किलो दानेणार कॅल्शियम नायट्रेट द्यावे.
तणनियंत्रण: पारिजात एग्रो केमिकल च्या तबाह या तण नाशकाचा उपयगो प्रती एकर 200 लीटर पाण्यात 125 ग्राम या प्रमाणात करावा. फवारणी पेरणी नंतर तीन दिवसांच्या आत करावी. या उत्पादनात ऑक्सीडायअर्गिल (Oxadiargyl 80% WP) हे सक्रिय तत्व आहे. १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली २0 दिवसांनी व दुसरी ३५ ते ४o दिवसांनी. सुरुवातीचे 35 दिवस तण साफ ठेवल्यास पुढे ते डोके वर काढू शकत नाही कारण पिकांची वाढ चांगली झालेली असते.
जल व्यवस्थापन: अतिवृष्टी किंवा उतारात केलेल्या चुकीमूळे पिकात पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. मूळे सडतात. उतार नीट काढावा. पावसाळ्यात पाणी धरून ठेवणाऱ्या शेतात हे पीक घेऊ नये. मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पीक फुलोरा अवस्थेत असतांना तुषार सिंचन करु नये. पीक फुलावर आल्यावर व बी तयार होत असतांना पाणी कमी पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी कारण अश्या मूळे उत्पादन तर घटेलच पण तेलाचा उतारा देखील घसरेल.
सूर्यफुल म्हणजे काही एक फूल नसून छोट्या छोट्या २००० फुलांचा गुच्छ असतो.
कीड-रोग नियंत्रण: सुरवातीच्या अवस्थेत रोगकिडी येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी सुरवातीला निरीक्षण करणे आवश्यक आहे. शेतात फिरत काय वेगळे दिसते आहे याची पहाणी करावी. जिथे काही वेगळे दिसेल तिथे आस पास च्या आठ दहा रोपांची कसून पहाणी करावी. लपलेली कीड शोधावी. एकीकृत कीड नियंत्रण वापरल्याने खर्च कमी रहातो व पिकाची अवस्था चांगली टिकून रहाते. गंध सापळे (फेरोमोन) लाऊन त्यात पकडली जाणारी कीड निरखून तपासावी. चिकट व लाइट सापळे लाऊन त्यात अडकणारी कीड देखील कसून तपासावी. निरीक्षणा नुसार नियंत्रण करावे. सूर्यफूलात दोरी कीड (Golden twin spot tomato looper), हेलीकोवर्पा (बोंडअळी, घाटे अळी), बिहारी केसाळ अळी, लहान काळी अळी (Spodoptera exigua) व चक्रीभुंगा (सोयबिन मध्ये येणारा) यांचा प्रकोप होऊ शकतो. सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या र्नियंत्रणासाठी एच एन पी व्ही (HNPV) या विषाणूजन्य कीटकनाशकाची २०० मी.ली. प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी तसेच क्रायसोपर्ला कारर्निया, लेंडीबर्ड यांच्या 20000 अळ्या, रसशोषण करणा-या किंडीच्या नियंत्रणाकरिता, प्रादुर्भाव दिसताच सोडाव्यात.
विषाणूजन्य रोगाचा प्रसार सशोषक फुलकिंड्यांमार्फत होतो. फुले उमलण्या पूर्वी पुलकिंडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रोड़ 17.8 एस.एल. ३ ते ५ मी लीं. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात पेरणींनंतर ११ दीवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. मावा व तुङ्तुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमीथोएट ३० टक्के प्रवाही २० मीली. प्रती १० लीटर या प्रमाणात फवारावे.
घाटेअळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोफाँस ५० ईसी २० मीली. प्रती १० लिटर किंवा क्वीनॉलफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मी.ली. प्रती १० लिटर किंवा थायमेथेक्झाम २५ टक्के ड्ब्लूजी ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी.
केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही १५ मिलि प्रती १० लीटर ची फवारणी करावी.
पक्षी नियंत्रण: पोपटा सारखे पक्षी या पिकात नासधूस करतात त्यामुळे फूल उमलल्यावर व बी भरले जात असतांना पक्षांचे थवे हुसकावण्यासाठी ध्वनि व झीलमिल चमकी चा उपयोग करावा.
आसमानी संकटे/वातावरणातील बदल: गारपिट व सोसाट्याचा वारा या पिकाचे नुकसान करू शकतात म्हणून हे पीक खर्च कमी ठेवत वर्षातून तीनदा घेत, सरासरी नफा मिळवण्यावर भर द्यावा.
काढणी व मळणीतील चुका: काढणी, हाताळणी, मळणी व साठवण करण्या बद्दल संपूर्ण माहिती मिळवून योग्य त्या सोयी करा. सूर्यफुलाची पाने, पाकळ्या व फुलाची मागील बाजू पैिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.
सूर्यफूल पिकाचा उपयोग प्रदूषण कमी करण्यासाठी होतो. चर्नोबिल व फुकुशिमा या अणुऊर्जा दुर्घटना घडल्यावर पर्यावरण सफाई साठी, त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सूर्यफूल लागवड करण्यात आली होती.
उत्पादनवाढीसाठी पुढील महत्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे
पीक फुलो-यात असताना सकाळी ४ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड़ गुंढाळून फूलाच्या तबकावरुन फुलाच्या बाहेरील कडेपासून मध्यापर्यंत हळुवार हात फिरवावा. यामुळे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
सूर्यफूल पिंकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमीनीत खोलवर जातात. एकाच तुकड्यावर लागोपाठ हे पीक घेतल्यास मातीचा पोत बिंघडतो, तसेच रोग व किंडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी मळणी नंतर कमीतकमी 8 महीने तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.
परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्टरी ४ ते ५ मधमाश्याच्या पेट्या ठेवाव्यात. पीक फुलो-यात असतांना कोठल्याही कीडनाशकांची फवारणी करु नयें, कारण त्यामुळे मधमाश्यांचीं क्रियाशीलता कमी होते.
नफा वाढवण्याची योजना: यूक्रेन, रशिया, चायना हे प्रमुख उत्पादक आहेत व तेथील उत्पादना नुसार सूर्यफूलाचे बाजारभाव अवलंबून असतात. हमीभाव फार उपयोगी ठरत नाही. या देशातून सूर्यफुल बिया आयात होत नाहीत त्या ऐवजी तेल आयात होते. भारतात आल्यावर त्यावर प्रक्रिया करून फिल्टर व रिफाईन तेल तयार होते. हे तेल मोठ्या प्रमाणात वितरित होते व तेलाचे भाव ठरवते. त्यावरुण आपल्या सूर्यफूलाचे भाव ठरतात. ही साखळी तोंडायची तर आपल्याला वेगळा ग्राहक जोडायला हवा. सूर्यफूल तेलाचे फायदे लक्षात घेता हे सहज शक्य आहे. कच्ची घाणी किंवा घरगुती मशीन वर तेल काढणारा किंवा कच्ची घाणी तेल वापरणारा ग्राहक जोडावा, त्यासाठी बी, टरफले काढलेला मगज व कच्ची घाणी तेल ही उत्पादने तयार करून मोठ्या किराणा चेन किंवा एमेझोन सारख्या ऑनलाइन दुकानातून विकावी. अश्या पद्धतीने नफा वाढवू शकता. अधिक माहिती साठी आमचा विशेष लेख नक्की वाचा.
मित्रहो, रिसेटएग्री डॉट इन ही वेबसाइट आपल्याशी नियमित संवाद साधत आहे. कमेन्ट करून आपण प्रतिसाद देऊ शकता.
दोन मिनिटांत वाचून होणारे आमचे लेख आपल्याला कालबाह्य धारणा खोडायला मदत करतील. काही लेख आपल्याला जागृत करतील, मनोधैर्य उंचावतील, उपयुक्त माहिती देतील, प्रश्न विचारतील किंवा सोडवतील. तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातून दोन मिनिट आमचे लेख नियमित वाचायचे आहेत. आम्ही कुठलीही फी मागत नाही. आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा किंवा व्हाटसअप चैनल ला जॉइन करा. नॉटिफिकेशन सुरू ठेवा आणि तयार व्हा.. रोज थोडे वाचन.. रोज थोडा बदल करायला!
ता. क. डॉ. वा. ब. राहुडकर लिखित "सूर्यफूल" या पुस्तकात "लागवड व्यवस्थापना" सोबत वाचा भरपूर समर्पक माहिती. घरपोच मिळवण्यासाठी इथे क्लिक करून ऑर्डर करा. धन्यवाद!