भाजीपाल्याचे इतके प्रकार.. जमले तर कुबेराचे बाप व्हाल!
शेअर करा
“घरकी मुर्गी - दाल बराबर” ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. ती खरी सुद्धा आहे. आपण शेतात रहातो व भाजीपाला नेहमीच इतका पाहतो की आपल्याला त्याचे काही नवल वाटत नाही. आपण त्याची किंमत करत नाही. पण शहरातील लोकांचे काय? त्यांना कोणताही भाजीपाला पांव किलो सुद्धा म्हटला तर मोठी किंमत मोजावी लागते. आरोग्या साठी खवैय्येगिरी ते मोठ्या हौसेने पैसे खर्च करायला तयार देखील असतात. जो कुणी नियमितपणे, खात्रीशीर दर्जाचा, भरपूर प्रकारचा भाजीपाल्याचा पुरवठा शहरात करू शकतो, तो चांगला नफा कमवू शकतो.
गणिताचे शिक्षक म्हणतात की एकच गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येते. एकच व्यक्ती, वेगवेगळ्या वेळी; वेगवेगळ्या पध्दतीने गणित सोडवू शकतो. उत्तर मात्र अचूक असायला हवे. भाजीपाला शेती व विक्रीचे असेच आहे. ज्याला नफा कमवायचा असतो त्याला तो मिळतो. ज्याच्या मनात शंका व कृतीत हुशारी नसते, तो स्वत:च्या धोतरात खिळा टोकून.. भुत भूत करीत जीव सोडतो.
पालक, मेथी, माठ, कोथिंबीर, आंबटचूका, अंबाडी, आळू, पुदिना, लेटयूस्, केल, स्विस चार्ड, बटाटे, कांदे, लसूण, अद्रक, गाजर, मुळा, बीट, साखरू, दुधी, भोपळा, कारले, दोडके, पडवळ, गोलभेंडी, भेंडी, मिरची, वांगे, टमाटे, शिमला मिरची, कोबी, गड्डा कोबी, मटार, चवळी, गवार, वाल, काकडी, वांगे, शेवगा, ब्रोकोली, झुकीनि अशी अजूनकितीतरी नावे घेता येतील. अनेक भाज्या अश्या आहेत ज्या रोज लागतात व कितीतरी भाज्या आठवड्यातून एकदा तरी हव्या असतात. आज काल तर सर्व भाज्यांना, वर्षभर एक सारखी मागणी असते.
अर्थात यातून पैसा कमावणे अगदीच सोपे नाही. सर्वात पहिले इतक्या सगळ्या भाज्यांच्या लागवड, व्यवस्थापन, काढणी यांचे ज्ञान व कौशल्य हवे. चांगले वेळा पत्रक बनवून हवी तेव्हा, हवी तितकी भाजी काढायचे व्यवस्थापन करायची सचोटी असायला हवी. ग्राहक शोधून, त्याला बांधून ठेवायची हुशारी हवी. इतके असून देखील माल उरला तर न रडता त्याचा योग्य तो वापर करायची सकारात्मकता हवी. निर्जलीकरण, पिकलिंग, लायोफीलायझेशन, कोल्ड स्टोरेज असे कितीतरी पर्याय आता उपलब्ध आहेत.
लक्ष्य डबास: चांगल्या पगाराची नोकरी सोडून भाजीपाला शेती कडे वळलेला “लक्ष्य डबास”, हा तरुण आपल्यासाठी चांगली प्रेरणा ठरतो. भावा सोबत मिळून लक्ष्य 28 ते 30 एकरवर भाजीपाला पिकवतो. त्यासाठी त्यांनी एक विस्तृत वेळा पत्रक बनवले असून वर्षभर सातत्याने भाज्यांचा पुरवठा करता येईल असे त्यांचे नियोजन असते. त्यांच्या या उद्योगाला त्यांनी यूट्यूब, कृषि पर्यटन, प्रशिक्षण अशी जोड दिली आहे. खर्च कमी राखत, वैज्ञानिक आधारावर त्यांनी आज देश-विदेशात आपली ओळख निर्माण केली आहे. वाऱ्यावरची वरात घेऊन अमक्या शेतीतून कमावले करोडो असे दावे करणाऱ्या फालतू यशोगाथे पेक्षा, लक्ष्य डबास ची यशोगाथा उजवी आणि चिरकाळ प्रेरणा देणारी आहे.
ज्ञानेश्वर बोकाडे: अभिनव फार्मर क्लब चे ज्ञानेश्वर बोकाडे यांची भाजीपाला शेतीला सांघिक जोड द्यायची युक्ति अतिशय प्रेरणा दायी आहे. अकरा शेतकऱ्या पासून सुरू झालेल्या या क्लब चे आता दीड लाखांपेक्षा अधिक सदस्य आहेत. सेंद्रिय शेतीच्या वारुवर स्वार होत, बोलक्या ज्ञानेश्वर बोकाडे यांनी आपल्यासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. एकीकडे इंटरनेट, तंत्रज्ञान याचा वापर व दुसरी कडे कट्टर सेंद्रिय धारणा असा विरोधाभासी मेळ ते साधतात. छान बोलतात, प्रेरणा देतात.
सकीना आणि जोशुना: आपल्या जेवणातल्या भाज्या कुठून येतात? कोण पिकवते? कसे पिकावते? ते खरच ताजे आहे का? त्यात आपल्या पोषणासाठी आवश्यक सर्व द्रव्य आहेत का? या प्रश्नांची उत्तरे शोधत सकीना आणि जोशुना यांनी हरबिव्होर फार्म ची सुरुवात केली. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारित सलाद उगवत सुरुवात झाली. रसायन विरहित कापून, धुऊन तयार भाज्याचा रतीब, रिसायकल पैक मध्ये ते घरपोच व वेळापत्रका नुसार देतात. ग्राहक त्यांचा फार्म सीसीटिव्ही च्या माध्यमातून कधीही पाहू शकतात. सोशल मिडियावर नियमित अपडेट पाहू शकता. यातून ग्राहकांना आपले अन्न वाढतांना, काढतांना, कापतांना, धूतांना आणि पेकिंग होतांना पाहता येते. त्याबद्दल सोशल मिडियावर कोण काय कमेंट करते आहे ते पहाता येते!
मित्रहो, धारणा मुक्त, विवेकशील वैज्ञानिक शेतीतून आपला शेतकरी एक समृद्ध जीवन जगू शकतो. या एकमेव संकल्पनेला आपल्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी, आम्ही आपल्यासाठी छोटे खानी लेखांची विस्तृत लेखमाला घेऊन येत आहोत. रोज दोन मिनिट वाचा आणि टप्या टप्याने स्वत:त बदल करत, समृद्धी कडे वाटचाल करा. आमचे लेख नियमित वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा किंवा व्हाटसअप चैनल ला जॉइन करा! नोटिफिकेशन सुरू ठेवायला विसरू नका!







